• केंद्रीय रस्ते व वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती
  • 18 महिन्यात होणार काम पूर्ण
  • 50 कोटी 60 लाख रुपयाची तांत्रिक मान्यता
  • नांदेड, (जिमाका) दि. 18 :- महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर लिफ्टसह स्कायवॉकची सुविधा अवघ्या 18 महिन्यात भक्तांना उपलब्ध होणार आहे. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, भक्तांसाठी अत्यावश्यक असलेल्या या सुविधेच्या निर्मितीचे भूमीपूजन केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते शनिवार 20 मे 2023 रोजी संपन्न होणार आहे. माहूर येथील पुसद मार्गावर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या समोरील प्रांगणात सकाळी 10 वा. होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रेणुका देवीसंस्थाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर हे राहतील.

    या समारंभास नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार सुधाकर श्रृंगारे, विधानपरिषद सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, राम पाटील रातोळीकर, विधानसभा सदस्य आ. भिमराव केराम, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. डॉ. तुषार राठोड, आ. शामसुंदर शिंदे, आ. मोहनराव हंबर्डे, आ. बालाजी कल्याणकर, आ. राजेश पवार, आ. जितेश अंतापूरकर, माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फेरोज दोसानी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

    माहूर गडावरील या महत्वपूर्ण सुविधेबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन महिन्यापूर्वी नांदेड येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात रेणुका भक्तांना आश्वासीत केले होते.

  • स्काय वॉकची लांबी 70 मीटर तर रुंदी 15 मीटर असेल.
  • लोवर स्टेशन लिफ्ट टॉवरची उंची 25 मीटर असून एकुण 4 लिफ्टची 20 प्रवाशी क्षमता असेल.
  • अपर स्टेशन लिफ्ट टॉवरची उंची 23 मीटर असून एकुण 4 लिफ्टची 20 प्रवाशी क्षमता असेल.
  • या प्रकल्पाची वाहतूक क्षमता एकावेळेस 80 प्रवासी चढणे व उतरण्याची असेल.
  • या प्रकल्पामध्ये एकुण 32 दुकान गाळे, प्रसाधन गृह, सुरक्षा कर्मचारी कक्ष, उपहार गृह उपलब्ध असतील.
  • मंदिर प्रशासनासाठी स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय राहील. दर्शनीय लॉबी, भविष्यातील गरजेनुसार ट्रॅव्हेलेटरचे प्रयोजनासह राहील.
  • सोलार सिस्टीम प्लांट, भूमिगत पाणी टाकीची क्षमता 2 लाख लिटरची असेल.
  • याचबरोबर घनकचरा निर्मुलन व्यवस्था, प्रतीक्षालये, वृद्ध व दिव्यांगासाठी स्वतंत्र दर्शन रांग, सीसीटीव्ही कॅमेरा व्यवस्था, हिरकणी कक्ष व दोन स्वतंत्र कक्ष राहतील.
  • याचबरोबर इतर अनुषंगिक सुविधेचा यात समावेश करण्यात आला आहे.

    श्री रेणुका देवी मंदिर माहूरगडसाठी लिफ्टसह स्काय वॉकचे बांधकाम करण्यास केंद्रीय मार्ग निधी योजनेअंतर्गत सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून एकुण 51.03 कोटी रुपयास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. स्थापत्य व विद्युतसाठी 50.60 कोटी रुपयास तांत्रिक मान्यता दिली आहे. या कामाचा कालावधी हा 18 महिने असून प्रकल्प हाताळणे व देखभाल, दुरूस्तीसाठी 10 वर्षाचा कालावधी राहील. कामाची अंदाजित किंमत ही 39 कोटी 91 लाख रुपये वस्तू व सेवाकर वगळून आहे. प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा मे. व्यापकॉस ली. गुरूग्राम आहे. मे. डी. सी. गुरूबक्षानी नागपूर यांना हे काम देण्यात आले आहे.