१. साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ शक्तिपीठ
महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर हे गाव धार्मिक दृष्ट्या अत्यंत पावन, जाग्रुत व ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्रात आदिमायेची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात — तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी (अर्धे पीठ). यामध्ये माहूर गड हे आई रेणुकेचे मूळ अधिष्ठान मानले जाते.
माता रेणुका भगवान परशुरामांच्या सविनय प्रार्थनेला अनुमोदन देऊन जगत् कल्याणासाठी अनादी काळापासून मातापूर (माहूर) क्षेत्री विराजमान आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे निसर्गरम्य स्थान आध्यात्मिक शांती व चैतन्याचे उगमस्थान आहे.
२. भगवान परशुराम, जमदग्नी ऋषी व मातृतीर्थ निर्मिती
भगवान परशुरामांनी सहस्रार्जुनाचा पराभव केल्यानंतर मातेची आज्ञा मानून माता रेणुका व पिता जमदग्नी ऋषींना माहूर क्षेत्री आणले असता, आकाशवाणी होऊन याच परमपवित्र भूमीवर (कोरी भूमीवर) पित्याची अंत्येष्टी कर अशी आज्ञा झाली. त्यावेळी मातापूर क्षेत्राचे आराध्य भगवान दत्तात्रेय प्रकट झाले व त्यांनी भगवान परशुरामांना जमदग्नी ऋषींच्या और्ध्वदेहिक कर्मासाठी पवित्र जलाची निर्मिती करण्याची आज्ञा केली.
त्यानंतर भगवान परशुरामांनी आपल्या तपोबलाने शरसंधान करून अनेक पवित्र तीर्थे निर्माण केली. त्यातील 'मातृतीर्थ' हे प्रमुख तीर्थ होय. भगवान दत्तात्रेयांनी परशुरामांच्या विनंतीवरून आचार्यत्व स्वीकारून जमदग्नी ऋषींचे कर्म पूर्ण केले.
माता रेणुका मातृतीर्थात स्नान करून सती जाण्यास निघाली असता, भगवान परशुरामांनी आक्रंदून टाहो फोडला. तेव्हा मातेने ‘मी तुला एक महिन्यात सदेह दर्शन देईन’ असे वचन दिले. परशुरामांनी १३ व्या दिवशीच मातेचे आर्ततेने स्मरण केल्यावर आई रेणुका सह्य पर्वतावर स्वयंभू रूपात अवतीर्ण झाली. तेच सर्व भक्तांचे माहेर असलेले आजचे मूळपीठ श्री रेणुका मंदिर होय!
३. नित्य वैदिक पूजा विधी व संतांची मांदियाळी
नित्य वैदिक विधी:
मातेच्या पूजेला पहाटे ५:३० वाजता काकड आरती व वैदिक शांति सूक्ताने प्रारंभ होतो. भगवतीचे मुख्य अर्चक श्री सूक्त, पुरुष सूक्त व रुद्र सूक्ताने माहूर गडावर त्रिपुर सुंदरी रेणुकेची षोडशोपचार पूजा नित्य करतात. दुपारी १२:०० वाजता महानैवेद्य व महाआरती होते. नवरात्रोत्सवात चतुर्वेद विशेषालंकार पूजेसहित मातेचा छबीना काढला जातो.
पुनीत संत परंपरा:
वशिष्ठ, व्यास, पराशर, जमदग्नी, कश्यपादी ऋषींची तपोस्थाने माहूर क्षेत्री होती. हे स्थान संतश्रेष्ठ विष्णुकवी महाराज, साधू महाराज, संत दासोपंत, प.पू. टेंब्ये स्वामी महाराज आणि भगवान श्रीधर स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झाले आहे. विष्णुकवींनी अत्यंत वात्सल्य भावाने रचलेली देवीची पदे व आरत्या आजही गडावर अखंड निनादतात.