।। श्री रेणुका माता प्रसन्न ।।
श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड
🌺 ।। श्री रेणुकायै नमः ।।
🌺 ।। ॐ ऐं ह्रीं क्लीं श्री रेणुकायै नमः ।। 🌺 | साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ
हेल्पलाईन: 9850335335 भाविक संख्या: 13,165,386 लॉगिन

।। श्री रेणुका महात्म्य व पावन इतिहास ।।

साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ शक्तिपीठ — अनादी काळापासून मातापूर क्षेत्री विराजमान जगन्जननी आई रेणुकेची अलौकिक महती

मुखपृष्ठ » माहूर संस्थान » श्री रेणुका महात्म्य
।। श्री रेणुका महात्म्य श्लोक ।।
।। श्री रेणुका देव्यै नमः ।।
मूलस्थाने नरानार्यः प्रत्यक्षं राममातरम् ।
पश्येयुस्ते विपाप्मानः प्राप्नुयुस्ते हरेः पदम् ।।
श्लोक अर्थ: मूलस्थानात (श्री क्षेत्र माहूर गडावर) प्रत्यक्ष राममातेच्या म्हणजेच आई रेणुकेच्या केवळ दर्शनाने सर्व नर आणि नारी सर्व पापातून मुक्त होऊन परम विष्णुपदाला प्राप्त होतात.
श्री रेणुका माता स्वयंभू रूप माहूर गड स्वयंभू मूळपीठ — श्री क्षेत्र माहूर गड
साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ पूर्णपीठ

अनादी काळापासून मातापूर क्षेत्री विराजमान कुलस्वामिनी

श्री क्षेत्र माहूरगड येथील कुलस्वामिनी माता रेणुकेची अलौकिक महती वर्णन करणारा श्री रेणुका महात्म्यातील वरील श्लोक अत्यंत यथार्थ व फलदायी आहे. महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील माहूर हे गाव धार्मिक दृष्ट्या अत्यंत पावन, जाग्रुत व ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे.

महाराष्ट्रात आदिमायेची साडेतीन शक्तिपीठे मानली जातात — तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी (अर्धे पीठ). यामध्ये माहूर गड हे आई रेणुकेचे मूळ स्वयंभू तांदळा रूप असलेले पूर्णपीठ मानले जाते.

माता रेणुका भगवान परशुरामांच्या सविनय प्रार्थनेला अनुमोदन देऊन जगत् कल्याणासाठी अनादी काळापासून मातापूर क्षेत्री विराजमान आहे.

अध्याय १

१. अवतार कथा व सहस्रार्जुन पराभव

भगवान परशुरामांनी महिष्मती नगरीतील भगवान दत्तात्रेयांचा भक्त असलेल्या परंतु कामधेनूच्या लोभाने उन्मत्त झालेल्या सहस्रार्जुनाचा पराभव केला. त्यानंतर मातेची आज्ञा मानून माता रेणुका व पिता जमदग्नी ऋषींना माहूर क्षेत्री आणले असता, आकाशवाणी होऊन "याच परमपवित्र भूमीवर (कोरी भूमीवर) पित्याची अंत्येष्टी कर" अशी दिव्य आज्ञा झाली.

अध्याय २

२. भगवान दत्तात्रेय प्रकटीकरण व मातृतीर्थ निर्मिती

त्याचवेळी मातापूर क्षेत्राचे आराध्य भगवान दत्तात्रेय प्रकट झाले व त्यांनी भगवान परशुरामांना श्री जमदग्नी ऋषींचे कर्म करण्यासाठी जलाची निर्मिती करण्याची आज्ञा केली. तेव्हा भगवान परशुरामांनी आपल्या तपोबलाने शरसंधान करून अनेक पवित्र तीर्थे निर्माण केली. त्यातील 'मातृतीर्थ' हे प्रमुख तीर्थ होय. पुढे भगवान दत्तात्रेयांनी परशुरामांच्या विनंतीवरून आचार्यत्व स्वीकारून जमदग्नींचे और्ध्वदेहिक कर्म पूर्ण केले.

अध्याय ३

३. मातेचे सदेह दर्शन व स्वयंभू मूळपीठ

माता रेणुका मातृतीर्थात स्नान करून सती जाण्यास निघाली असता, भगवान परशुरामांनी टाहो फोडला. तेव्हा मातेने "मी तुला एक महिन्यात सदेह दर्शन देईन" असे वचन दिले. पुढे माता अग्नितत्त्वात विलीन झाल्यावर परशुरामाने मातृतीर्थावर तेराव्या दिवशीच मातेचे आर्ततेने स्मरण केले. पुत्राचे कासावीस रुदन पाहून मातेला आणि ऋषी जमदग्नींना प्रगट व्हावे लागले. त्या अग्निस्थानाला 'मुलदरी' अथवा 'कोरीभूमी' असे म्हणतात.

पुढे जगन्जननी रेणुका सह्य पर्वतावर भगवान परशुरामाला स्वयंभू दर्शनासाठी अवतीर्ण झाली. तेच सर्व भक्तांचे माहेर मूळपीठ श्री रेणुका मंदिर होय!

अध्याय ४

४. नित्य वैदिक षोडशोपचार पूजा व नवरात्रौत्सव छबीना

मातेच्या पूजेला सकाळी ६:०० वाजता वैदिक शांति सूक्ताने प्रारंभ होतो. भगवतीचे मुख्य अर्चक श्री सूक्त, पुरुष सूक्त व रुद्र सूक्ताने वातावरणात त्रिपुर सुंदरी रेणुकेची षोडशोपचार पूजा नित्य करतात. तसेच मंदिर परिसरात अनेक पुरातन परिवार देवतांची पूजा नित्य यथासांग करून दुपारी साडे दहा वाजता महानैवेद्य व महाआरती होते. नवरात्रौत्सव काळात चतुर्वेद विशेषालंकार पूजेसहित मातेचा 'छबीना' (सर्व परिवार देवतांची परिक्रमा) काढला जातो. हे सह्याद्री खंडातील रेणुका महात्म्य व कालिका खंड या दुर्मिळ ग्रंथांवरून स्पष्ट होते.

अध्याय ५

५. काशीसमान पावन तीर्थ व संतांची मांदियाळी

वशिष्ठ, व्यास, पराशर, जमदग्नी, कश्यपादी ऋषींची आश्रमे व तपःस्थाने याच ठिकाणी होती. असे हे स्थान मातृकृपांकित संतश्रेष्ठ विष्णुकवी महाराज, साधू महाराज, संत दासोपंत, प.पू. टेंब्ये स्वामी महाराज, भगवान श्रीधर स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झाले आहे. मातेचे प्रत्यक्ष दर्शनानुभूती घेतलेल्या विष्णुकवींनी ज्या मातृभक्तीने व वात्सल्यभावाने अभंग व पदांची रचना केली, ती याच क्षेत्री मातेच्या चरणाशी केली.

मातापूर म्हणजेच माहूरचे महात्म्य मुक्तिक्षेत्र काशी नगरीप्रमाणेच आहे. ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करताना प्रथम दोन नगरी निर्माण केल्या — श्री क्षेत्र काशी व श्री क्षेत्र मातापूर (माहूर). उच्चतम महती असलेल्या या पुरातन क्षेत्रावर साक्षात श्री रेणुका माता अखंड वास करीत आहे!

मूळ पूर्णपीठ

साडेतीन शक्तिपीठांपैकी स्वयंभू पूर्ण अधिष्ठान

पवित्र मातृतीर्थ

परशुरामांनी तपोबलाने शरसंधान करून निर्माण केलेले तीर्थ

दत्तप्रभूंचे जन्मस्थान

अत्री-अनुसया तपोभूमी व दत्तात्रेयांचे विश्रामस्थान

काशीसमान महात्म्य

ब्रह्मदेवाने सृष्टीच्या प्रारंभी रचलेली परम पावन नगरी

।। दर्शनाने सर्व पापे नष्ट होऊन परम शांती लाभते ।।

घरी बसून थेट गाभारा दर्शन घ्या किंवा आगामी नवरात्रोत्सवासाठी पूजा व देणगी सेवा नोंदवा.